लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात पतंगाच्या कापाकापीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा जीवघेणी संक्रांत घेऊन येतो. यंदाही गेल्या १५ दिवसांत या मांजामुळे राज्यभरात ३८ जण जखमी झाले आहेत. बहुतेक जखमींचे गळे कापले गेले आहेत. राज्यात नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असली तरी ती नावालाच असल्याचे चित्र आहे. या मांजाचा सर्रास वापर सुरू असून पोलिसांच्या थातुरमातूर कारवाया आणि कारवाईचे अधिकार असलेले जिल्हा प्रशासन, महानगर आणि नगर पालिकांची उदासीनता यामुळे रस्त्यावरील निष्पाप जीवावर बेतणाऱ्या घटनांसाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ चमूने राज्यातील २५ जिल्ह्यांचा आढावा घेतला असता जानेवारी महिन्यात पोलिसांनी १३१ कारवाया करीत २७.१० लाखांचा मांजा जप्त केल्याचे निदर्शनास आले. नायलॉन मांजाचे तस्कर मोठ्या संख्येने वाढले आहेत. याला पतंग शौकिनांकडून असलेली मागणी कारणाभूत आहे. बंदी नसलेल्या राज्यांतून हा मांजा महाराष्ट्रात येतो. तो तिप्पट किमतीमध्ये विकला जातो. मांजा ऑनलाइनदेखील उपलब्ध आहे. यामुळे शौकिनांचे व तस्करांचे फावते.
ही घ्या काळजी…
- गळ्याभोवती जाड रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळा. नसल्यास शर्टचे वरील बटण लावा.
- दुचाकी कमी वेगाने चालवा, उड्डाणपुलावरून वाहने चालविताना सावध राहा
- हेल्मेटची काच लावून दुचाकी चालवा, मांजा समोर आला तर हात समोर करून गळा वाचवा.
- कुणी नायलॉन मांजा वापरत असेल तर लगेच पोलिसांना कळवा.
नायलॉन मांजा हा धोकादायक असून, यासंदर्भात वारंवार आवाहन करण्यात येत आहे. जर कुणी नायलॉन मांजाची वक्रिी अथवा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवावे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, नागपूर
पक्षी नायलॉनमध्ये अडकलेला मी पाहिला आहे. मला प्रचंड त्रास झाला. मी त्यावर संशोधन करून ‘मांजा’ हा लघुपट बनवला. अनेकांना मांजामुळे जीव गमवावा लागलाय. याविषयी जनजागृती खूप आवश्यक आहे. - पांडुरंग भांडवलकर, दिग्दर्शक, मांजा