‘गणेशोत्सवाचा आनंद जागरूक राहून लुटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 03:24 AM2019-09-01T03:24:30+5:302019-09-01T03:25:09+5:30
मोहरमचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी सामाजिक सौहार्द जपणे महत्त्वाचे
जमीर काझी
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर नेहमीच अतिरेक्यांच्या टार्गेटवर असते. मुंबईकरांच्या एकात्मतेचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात देशभरातील नागरिक मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी गणेशोत्सव व मोहरम एकत्रच येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी बाळगावी लागत आहे. त्या संदर्भात पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त (अभियान) प्रणव अशोक यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - गणेशोत्सव व मोहरमच्या काळात बंदोबस्ताची काय नियोजन केले आहे?
उत्तर - महानगरातील प्रत्येक सण, उत्सव महत्त्वाचा असल्याने, पोलिसांकडून प्रत्येक वेळी विशेष खबरदारी घेतली जाते. गणेशोत्सव व मोहरम शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय अन्य सुरक्षा यंत्रणांचे सहकार्य घेतले जात आहे. गणेशभक्तांना कसलाही त्रास होणार नाही, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळ व अन्य संबंधित घटकांसमवेत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दोन्ही महत्त्वाचे सण असल्याने सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, अभ्यासकांना विश्वासात घेऊन सुरक्षा बाळगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
प्रश्न - गर्दीच्या ठिकाणी होणारी महिलांची छेडछाड कशी रोखणार?
उत्तर - सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी दर्शनासाठी होणारी गर्दी व चेंगराचेंगरीच्या घटना लक्षात घेऊन त्या ठिकाणी चोवीस तास साध्या वेशात पोलीस गस्त घालत राहणार आहेत. त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. गैरकृत्य करणारे हुल्लडबाज, समाजकंटक व चोरट्यांवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल.
विसर्जनाच्या ठिकाणी विशेष खबरदारी
शहर व उपनगरात एकूण १२९ विसर्जन ठिकाणे असून, तेथे स्थानिक पोलिसांबरोबरच स्वयंसेवक, तटरक्षक स्वयंसेवी संस्था, एनसीसीचे विद्यार्थी तैनात असतील. नौदलाचीही समन्वय साधण्यात आला आहे, असे प्रणव अशोक यांनी सांगितले.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
मुंबईकरांनी जागरूक व दक्ष राहून गणेशोत्सवाचा आनंद लुटला पाहिजे, आपल्या सभोवती संशयास्पद, आक्षेपार्ह व गैरकृत्य घडत असल्यास तातडीने पोलिसांशी, हेल्पलाइन व नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून द्यावी, त्यामुळे गैरप्रकार तातडीने रोखता येतील. सामाजिक सलोखा, सौहार्द बिघडू न देण्याची जबाबदारी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अशोक यांनी केले.
पाच हजारांहून अधिक सीसीटीव्हींचे लक्ष
शहर व उपनगरात ५ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाईल. मुख्य नियंत्रण कक्षातून त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. गैरकृत्य, आक्षेपार्ह घटना आढळून आल्यास त्याबाबत तातडीने संबंधितांवर कारवाई केली जाईल.महिला, तरुणींनी निर्भयपणे सणाचा आनंद घ्यावा, असे अशोक म्हणाले.