लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करून लूट
By admin | Published: June 5, 2016 01:18 AM2016-06-05T01:18:01+5:302016-06-05T01:18:01+5:30
दिवसभर टॅक्सीमध्ये बसून सावज शोधायचे, सावज हाती लागताच, त्याला मदत करण्याच्या बहाण्याने लिफ्ट द्यायची. एकदा सावज जाळ्यात ओढला गेला, तर त्याला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन
मुंबई : दिवसभर टॅक्सीमध्ये बसून सावज शोधायचे, सावज हाती लागताच, त्याला मदत करण्याच्या बहाण्याने लिफ्ट द्यायची. एकदा सावज जाळ्यात ओढला गेला, तर त्याला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, कुमार पिल्ले, राजू महाडिक यांसारख्या गँगस्टरच्या नावाने धमकावत लुटायचे. अशा प्रकारे मुंबईत लुटीचे प्रकार सुरू होते. या लुटमारीतील मास्टरमाइंडला अटक करण्यास गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाला यश आले.
प्रवीण महादेव हेळकर (३७), सुरेश ओमप्रकाश सिंग (२८) असे अटक आरोपीचे नाव आहे. यामागील हेळकर हा सूत्रधार आहे. तो सराईत गुन्हेगार असून, २००८ मध्ये जबरी चोरीसारखे २५ पेक्षा जास्त गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत, त्यात त्याने शिक्षाही भोगलेली आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर, २०१५ पासून त्याने पुन्हा अशा प्रकारे लूट करण्यास सुरुवात केली. शनिवारी हेळकर हा सिंगसोबत मुलुंड चेकनाका येथे येणार असल्याची माहिती जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले, पोलीस निरीक्षक अशोक खोत, सहायक पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, नागेश पुराणिक यांच्या तपास पथकाने या ठिकाणी सापळा रचला. मुलुंड चेकनाका परिसरातून दोघांच्या मुसक्या आवळल्या. घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हेळकरने त्यांचे अपहरण केले. गँगस्टर छोटा राजनचा माणूस असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावली. त्यानंतर, टॅक्सीचालकाला ५०० रुपये देऊन व्यापाऱ्याला सुखरूप घरी सोडण्यास सांगितले होते. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मैत्रीतून झाली ओळख
- सुरेश सिंग बेरोजगार असल्याने त्याने कामासाठी मित्रांकडून मदत मागितली. मित्राने त्याची ओळख हेळकरसोबत करून दिली. त्यानंतर, सिंग आणि हेळकर दोघेही एकत्र काम करायला लागले.
खेळण्यातल्या बंदुकीचा वापर
सावजाचे अपहरण केल्यानंतर त्याला घाबरविण्यासाठी हेळकरने बाजारातून खेळण्यातली रिव्हॉल्व्हर विकत घेतली होती. याच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून या दुकलीने लाखो रुपये लुटले.