सव्वा कोटीची रोकड व्हॅनसह लुटली
By admin | Published: March 27, 2015 11:52 PM2015-03-27T23:52:45+5:302015-03-27T23:52:45+5:30
एटीएम सेंटरमध्ये पैसे जमा करणाऱ्या लॉजीकॅश या खासगी कंपनीची १ कोटी २८ लाखांची रोकड याच कंपनीसोबत काम करणाऱ्या चालकाने लुटली.
मुंबई : एटीएम सेंटरमध्ये पैसे जमा करणाऱ्या लॉजीकॅश या खासगी कंपनीची १ कोटी २८ लाखांची रोकड याच कंपनीसोबत काम करणाऱ्या चालकाने लुटली. अमरसिंग असे आरोपी चालकाचे नाव असून त्याने कंपनीची रोकड ठेवलेली व्हॅन पळवली. हा गुन्हा दुपारी साडेबाराच्या सुमारास अणुशक्तीनगर येथील सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या आवारात घडली.
ट्रॉम्बे पोलिसांनी चार विशेष पथके स्थापन करून अमरसिंगचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रोकड लॉजीकॅश कंपनीची होती. मात्र जी व्हॅन अमरसिंगने पळवली ती एका साळुंखे नावाच्या व्यक्तीकडून भाडेतत्वावर कंपनीने घेतली होती. साळुंखेने व्हॅनसोबतड्रायव्हरही (अमरसिंग) कंपनीला पुरवला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून अमरसिंग लॉजीकॅशची व्हॅन चालवत होता.
शुक्रवारी सकाळी नवीमुंबईतल्या लॉजीकॅशच्या कार्यालयातून अमरसिंग व्हॅन घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला. त्यात १ कोटी ४४ लाखांची रोकड होती. ही रोकड मुंबईतल्या सुमारे २० एटीएममध्ये भरली जाणार होती. व्हॅनचा पहिला थांबा अणुशक्ती नगरातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर होता. तेथे १६ लाखांची रोकड भरली जाणार होती. ही रोकड भरण्यासाठी कंपनीचे कर्मचारी खाली उतरले. सोबत व्हॅनवरील सुरक्षारक्षकही उतरला. ही संधी साधून अमरसिंगने चावी फिरवली आणि व्हॅनसह पसार झाला.
हे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार व्हॅन पकडण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी आपापल्या हददीत नाकाबंदी (मोटर व्हेईकल सीझर आॅपरेश) केली. तसेच शोधमोहिम सुरू केली. त्यानुसार मांटुंगा पोलिसांना एसआयडब्यूएस महाविद्यालयाजवळ लॉजीकॅश कंपनीची व्हॅन बेवारस अवस्थेत सापडली.
लॉजीकॅश कंपनीकडे विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे कंत्राट आहे. पैसे भरल्यानंतर बँका तितकी रक्कम आणि या सेवेसाठी ठरलेले कमिशन कंपनीकडे जमा करतात, अशी माहिती ट्रॉम्बे पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी )