Join us

सुट्या पैशांंसाठी सिनेमागृह लुटले

By admin | Published: November 16, 2016 6:03 AM

नोट बंदीच्या निणर्यानतर लुटारूंनीही नव्या नोटांच्या चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत फिल्मी स्टाईलने गिरगावातील प्रसिद्ध सेंट्रल प्लाझा

मनीषा म्हात्रे / मुंबईनोट बंदीच्या निणर्यानतर लुटारूंनीही नव्या नोटांच्या चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत फिल्मी स्टाईलने गिरगावातील प्रसिद्ध सेंट्रल प्लाझा सिनेमागृहाच्या कॅश कांऊंटरमधील १ लाख ४२ हजार रुपयांच्या नव्या नोटांची लूट केली आहे. सोमवारी दिवसभर या सिनेमागृहाच्या गल्ल्यावर लक्ष ठेवल्यानंतर लाखभर रुपयाच्या नव्या नोटा गोळा झाल्याचे लक्षात येताच लुटारूने मध्यरात्री सिनेमा गृह बंद झाल्यानंतर ही लूट केल्याने पोलीसही चक्रावले आहेत. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस तपास करत आहेत.बंद असलेली घरे, दुकाने, व्यावसायिक कार्यालये, ज्वेलर्समध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्या केल्यानंतर मिळणाऱ्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आता चलनात चालणार नाही. त्यामुळे लुटारुंनी नव्या नोटा, तसेच दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटा जमा होत असलेल्या ठिकाणांची रेकी करण्यास सुरूवात केली आहे. यातूनच त्यांनी सिनेमा गृहांना टार्गेट केल्याची माहिती समोर येत आहे. मुळात याच ठिकाणी नवीन आणि सुट्ट्या नोटा मिळण्याच्या खात्रीतून लुटारूंनी सिनेमागृहांकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले. गिरगावातील सेंटर प्लाझामध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास घुसलेल्या लुटारुने येथील स्लाईडर विंडो तोडून आतील काऊण्टरमधून लाखो रुपये चोरी करून तेथून पळ काढला.काउंटर उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत सांगितले. घटनेची वर्दी मिळताच व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या तपास अधिकारी शुभांगी मालुसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीत काउंटरमधील १ लाख ४२ हजार रुपये चोरीला गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्व दोन हजारांच्या नवी नोटांसह १०, २०, ५० आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी व्ही.पी रोड पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यांत नोंद करत फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अधिक तपास सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)