मुंबई - सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ केल्याचा दाखला देत, खासगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाच्या दरांत दुप्पट-तिप्पट वाढ करत प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई-कोल्हापूर/सातारा आणि मुंबई-चिपळूण/रत्नागिरी मार्गावरील लक्झरी वाहनांना गर्दी आहे. मुंबई कोल्हापूर/सातारा मार्गांसाठी अनुक्रमे सुमारे एक ते दीड हजार रुपये आकारण्यात येत आहेत. मुंबई-रत्नागिरी मार्गावरील वातानुकूलित बससाठी सुमारे १ हजार ते १ हजार ३०० या दरम्यान तिकीट आकारण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुंबई-कोल्हापूर मार्गावरील एसटीच्या वातानुकूलित शिवशाहीचे तिकीट सुमारे ७६५ रुपये आणि सातारापर्यंतचे तिकीट सुमारे ५२२ रुपये आहे. कोकणातील शिवशाहींच्या चिपळूण प्रवासासाठी सुमारे ५०० रुपये खर्च करावे लागतात. नियमांप्रमाणे खासगी लक्झरी चालकांना एसटी तिकिटांच्या तुलनेत सुमारे दीडपट रक्कम आकारण्यापर्यंत मान्यता आहे. मात्र, सणासुदीच्या दिवसांमध्ये गर्दीचा वेध घेत, खासगी चालकांकडून सर्रासपणे तिकिटाच्या दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.आम्हाला इंधनदरात सवलत मिळत नाहीइंधन दरवाढीचे कारण देत, एसटीसारख्या सरकारी वाहनांनी १० टक्के भाडेवाढ केली. महामंडळाला इंधन सवलतीच्या दरात मिळते. मात्र, आम्हाला बाजारभावानुसार इंधन घ्यावे लागत आहे, शिवाय खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसानात वाढ होत आहे. यामुळे सुमारे १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना याची कल्पना देण्यात येते. त्यानंतर, तिकीट बुक करण्यात येत असल्याची माहिती दादर पूर्वेकडील खासगी लक्झरी चालकांनी दिली.
खासगी वाहतूकदारांकडून लूट, तिकीट दर दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:15 AM