नवी मुंबई : स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईत लवकरच लूटेल कॅफे दिसणार आहेत. स्वच्छ भारत अभियानात गेल्या वर्षी नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आल्यानंतर पालिकेचा विश्वास दुणावला आहे. पालिकेने बसथांबे, मॉर्निंग वाॅकची ठिकाणे, उद्यानांमध्ये लूटेल कॅफे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या हैदराबाद येथे अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसथांबे, गर्दीची ठिकाणे, माॅर्निंग वाॅकची ठिकाणे आणि उद्यानांत अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. या सवयीस लूटेल कॅफेमुळे वेसण बसून ‘स्वच्छ भारत’लाही मदत होणार आहे. शिवाय महिलांची होणारी कुचंबणाही थांबणार आहे. यापूर्वी ई टॉयलेटची संकल्पना राबविली होती. परंतु, अल्प प्रतिसाद, वापराची माहिती नसणे यांसह इतर कारणांमुळे ही संकल्पना फेल गेली. यामुळे पालिकेने लूटेल कॅफेचा पर्याय शोधला आहे.
बसथांबे, ज्वेल ऑफ नवी मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना चाप बसावा, शहराची सुंदरता आणि स्वच्छतेत मदत व्हावी, यासाठी लूटेल कॅफे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. नवी मुंबईत पहिल्या टप्यात १० ठिकाणांची निवड केली असून, याबाबतची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात दोन कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत. नव्या वर्षात आयुक्त कैलास शिंदे यांच्या मान्यतेनंतर शहरात लूटेल कॅफे दिसू लागतील. - शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
पहिल्या टप्प्यात १० ठिकाणांची केली निवड- लूटेल कॅफेंसाठी पहिल्या टप्प्यात १० जागांची निवड करण्यात आली आहे. - सायन-पनवेल महामार्गावरील चार ठिकाणचे बसथांबे, ठाणे-बेलापूर मार्गावर ४ ठिकाणी, वाशीच्या मिनी सी शोअर येथे एक आणि आणि ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे एक अशा १० ठिकाणांची निवड केली आहे.
काय आहे संकल्पना?लूटेल कॅफे अंतर्गत एनजीओ वा खासगी संस्थांना बस थांबे, मॉर्निंग वाॅकच्या जागांसह उद्यानांच्या ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. स्वखर्चाने शौचालये बांधून देणार आहेत. त्या बदल्यात त्यांना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स वा नाश्त्याचे पदार्थ विकण्यासाठी १० बाय १० किंवा १० बाय १५ ची जागा मोफत देण्यात येईल. लूटेल कॅफेमुळे सायन-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्गावरील बसथांब्यावर जो बकालपणा दिसतो, प्रवाशांकडून जी घाण करण्यात येते, ती नाहीशी होईल, असा पालिकेला विश्वास आहे.