अभिनेत्याकडून वृद्धेची लुबाडणूक; ८० टक्के ऐवज मिळविला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:13 AM2018-04-19T03:13:57+5:302018-04-19T03:13:57+5:30
सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका कामतने घेतली.
मुंबई : गोरेगावच्या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या वृद्धेच्या घरात घुसून तिचे हातपाय बांधून तिला लुबाडण्यात आले होते. या प्रकरणी एका भोजपुरी अभिनेत्यासह दोघांच्या मुसक्या दिंडोशी पोलिसांनी बुधवारी आवळल्या असून, चोरीचा ८० टक्के ऐवजही हस्तगत केला आहे.
गोरेगावच्या गोकूळधाम परिसरातील पेंट हाउसमध्ये १४ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे चारच्या सुमारास पीडित ७६ वर्षीय महिला त्यांच्या बेडरूममध्ये आराम करीत होत्या. त्या वेळी दोन अनोळखी इसम तोंडावर कपडा बांधून त्यांच्या घरात घुसले. चाकूच्या धाकाने त्यांनी वृद्धेचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर त्यांचे कपाट उघडून सोन्याचे दागिने, भांडी आणि रोकड असा जवळपास १३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. वृद्धेने या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) राजेश प्रधान, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवी अडाणे, विलास भोसले, गणेश पवार यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते दोन अनोळखी इसम प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा घरगडी प्रकाश कामत हा बेडरूममधून बाहेर पडला. तसेच घरफोडी करणारे पसार झाले. त्याच वेळी कामतने घरात प्रवेश केला होता. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी कामतची चौकशी केली. १५ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका कामतने घेतली. मात्र, नंतर त्यानेच अन्य साथीदार आणि भोजपुरी चित्रपटात लहानमोठ्या भूमिका करणाºया ओम्कार उर्फ रोशन परमहंस पांडे (३१) याच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. १७ एप्रिलला पांडेला पोलिसांनी जोगेश्वरीतून ताब्यात घेत चोरीला गेलेला ८० टक्के ऐवज हस्तगत केला.
दोन अनोळखी इसम तोंडावर कपडा बांधून त्यांच्या घरात घुसले. चाकूच्या धाकाने त्यांनी वृद्धेचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर त्यांचे कपाट उघडून सोन्याचे दागिने, भांडी आणि रोकड असा जवळपास १३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. १७ एप्रिलला पांडेला पोलिसांनी जोगेश्वरीतून ताब्यात घेत चोरीला गेलेला ८० टक्के ऐवज हस्तगत केला.