प्रवेशाच्या नावाखाली लुबाडणूक
By admin | Published: January 14, 2015 02:43 AM2015-01-14T02:43:53+5:302015-01-14T02:43:53+5:30
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या पालकांची सध्या लुबाडणूक करण्यात येत असल्याचा प्रकार पनवेल परिसरात सुरू आहे.
वैभव गायकर, पनवेल
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या पालकांची सध्या लुबाडणूक करण्यात येत असल्याचा प्रकार पनवेल परिसरात सुरू आहे. उपलब्ध जागा आणि शुल्काबाबत संभ्रमावस्था असतानाच डोनेशनसाठी जागा भरल्याचा कांगावा शाळा व्यवस्थापन करत असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल तालुक्यात ५० पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. यामध्ये डीएव्ही, बालभारती, सेंट जोसेफ, कारमेल, संजीवनी, विश्वज्योत, रॅन, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, हार्मनी या ख्यातनाम शाळा आहेत. या शाळांना सिडकोने अल्प दरात भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. मात्र शाळांकडून पालकांची लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे. अनेक शाळेत जागांची संख्या कमी असून देखील हजारो प्रवेशअर्ज वाटप करण्यात येत आहेत. माहिती पुस्तिका आणि अर्जांच्या विक्रीतून शाळांना चांगला नफा मिळतो. मात्र पालकांचा वेळ व पैसा यामध्ये वाया जातो. नर्सरी, ज्यु. केजी, सी. केजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पनवेल परिसरात ३० ते ५० हजार रुपये ‘डोनेशन’चा दर आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांसाठी या शाळेत प्रवेश घेणे कठीण झाले आहे.
शिक्षणाच्या हक्कापासून कोणी वंचित राहू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असतात. मात्र नियमांची पायमल्ली होत असताना शिक्षणाधिकारीही बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये देखील याबाबत प्रचंड नाराजी असल्याचे पालक खाजगीत सांगतात. मात्र भीतीपोटी अनेक पालक पुढे येत नाहीत. अनेक पालक सांगतात की, प्रवेशासंदर्भात उर्वरित पैसे देणे असतील तर शाळा प्रशासन सतत नोटीस पाठवून पैशाची मागणी करीत असते, मात्र ही तत्परता प्रवेशप्रक्रियेत दाखवत नाहीत. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची मागणी केली जात आहे.