मुंबई : मुंबईच्या लोकलमधील प्रवासात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असून, सोमवारी वडाळा स्थानकात घडलेल्या एका घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रे रोड रेल्वे स्थानकात आलेल्या लोकलमधील मालडब्यात चार जणांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले. यात तब्बल 1क् हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी चार आरोपींपैकी दोन आरोपींना त्वरित अटक केली आहे.
वडाळा रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बेलापूर येथून सीएसटीकडे जाणारी लोकल सुटली. ही लोकल वडाळा रेल्वे स्थानकात आली असता त्या वेळी या लोकलच्या गार्डकडून असलेल्या मालडब्यात पाच प्रवासी चढले. त्यानंतर लोकल रे रोड रेल्वे स्थानकात दुपारी 3.20च्या सुमारास येताच फलाट नंबर 2वरून चार अनोळखी इसम या मालडब्यात चढले. त्यातील एका आरोपीने तर चाकूचा धाक दाखवण्यास सुरुवात केली तर अन्य आरोपी प्रवाशांना मारहाण करू लागले. मारहाण करत या आरोपींनी प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. ही लोकल डॉकयार्ड रेल्वे स्थानकात येताच चारही आरोपींनी पलायन केले. त्यानंतर याविरोधात वडाळा रेल्वे पोलिसांत तक्रार करण्यात आली. वडाळा रेल्वे पोलिसांनी याची माहिती घेताच सॅण्डहस्र्ट रोड ते रे रोड रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढला. त्या वेळी रे रोड स्थानकात चार संशयित फिरत असल्याचे रेल्वे पोलिसांना आढळून आले. त्यांना हटकले असता हे सर्व जण पळू लागले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता दोन आरोपींना पकडण्यात यश आले तर उर्वरित दोघे पोलिसांच्या तावडीतून निसटले. त्या दोघांचा रेल्वे पोलीस कसून तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.