मुंबई : मुंबई शहर, उपनगरात भगवान महावीर यांची जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले हाेते. तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील नेपियन्सी रोड येथे जैन बांधवांनी एकत्र येत भगवान महावीर यांच्या पंचधातूच्या मूर्तीची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या या मिरवणुकीतून एकोपा, अहिंसा याबाबत जनजागृती करण्यात आली. शहर, उपनगरातील विविध जैन मंदिरांमध्येही जैन बांधवांनी भगवान महावीर यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. घाटकोपर येथील जैन मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी दिवसभर रीघ लागली होती.
उमेदवारांच्या भेटीगाठी-
१) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनीही मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला. तसेच मंदिरांमध्ये दर्शन घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
२) मुंबई दक्षिण मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत, महायुतीचे मंगलप्रभात लोढा, शिंदेसेनेचे यशवंत जाधव, मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर संदेश पोस्ट करत महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ३) उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी पूजेत सहभाग घेतला. तसेच त्यांनी कांदिवली आणि बोरिवली येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांत उपस्थिती दर्शवत शोभायात्रेसह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी श्री परमपूज्य आचार्य श्री महाबोधी सुरीश्वरजी, परमपूज्य आचार्य श्री धर्म यशसुरीश्वरजी यांचे आशीर्वाद घेतले.
सोशल मीडियावर शुभेच्छा-
१) उत्तर पूर्व मतदारसंघात मविआचे संजय दिना पाटील यांनी श्री अखिल भांडुप जैन आयोजित जन्मकल्याणक महोत्सवास भेट देत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.
२) मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील मविआचे उमेदवार अनिल देसाई यांनी सोशल मीडियावर महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
३) दक्षिण मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी जैन धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले. उत्तर पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मुलुंड येथील तांबेनगर जैन उपाश्रय स्थानकवासी देरासरसह विक्रोळी, घाटकोपर आणि भांडुप येथील जैन समाजाच्या कार्यक्रमात तसेच मिरवणुकीत सहभाग घेत शुभेच्छा दिल्या.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गोरेगाव येथे महावीर जन्मकल्याणक शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. तसेच समस्त ‘दिगंबर जैन कासार समाज मंडळ, सर्वोदयनगर जोगेश्वरी पूर्व’ यांच्या वतीने आयोजित भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवात सहभागी घेतला. यावेळी त्यांनी जैन कासार समाज बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.