मुंबई : फेरीवाल्यांविरुद्ध पालिकेने सुरू केलेल्या कारवाईला सत्ताधारी पक्षाकडूनच विरोध होऊ लागला आहे़ शिववडापावच्या गाड्यांवरही कारवाई होऊ लागल्याने शिवसेनेचा संताप उफाळून आला आहे़ त्यामुळे गाड्या जप्त करून क्रश करण्याची पद्धत बंद न केल्यास रक्तपात होईल, असा इशारा शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे़बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे़ त्यानुसार त्यांचे सामान जप्त करून त्यांच्या गाड्याही तोडण्यात येत आहेत़ रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना यात लक्ष्य करण्यात आले आहे़ या कारवाईतून शिववडापावच्या गाड्याही सुटू शकलेल्या नाहीत़ ही कारवाई तत्काळ थांबविण्याची मागणी काँग्रेसनेही आयुक्तांकडे केली होती़ मात्र आयुक्त अजय मेहता यांनी ही कारवाई थांबविण्यास नकार दिला़ तरीही शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा विषय स्थायी समितीमध्ये पुन्हा चर्चेस आणला़ फेरीवाला धोरण अद्याप लागू झालेले नाही. फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली आहे़ तरीही या फेरीवाल्यांवर कारवाई कशी होते़, गाड्या क्रश करण्याची पद्धत बंद न केल्यास रक्तपात होईल, असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)दर पाच वर्षांनी होणार फेरीवाल्यांची नोंदणीदर पाच वर्षांनी फेरीवाल्यांची नोंदणी होणार आहे़ फेरीवाल्यांना प्रमाणित करण्याचे निकष ठरविण्यासाठी सात समित्या तयार करण्यात आल्या आहेत़ परवान्याची मुदत, नूतनीकरणाचा काळ आणि अन्य कोणत्या कारणामुळे फेरीवाल्यांचा परवाना रद्द होऊ शकतो, यावरही अभ्यास होणार आहे़ तसेच रात्री उशिरापर्यंत फेरीच्या व्यवसायाला परवानगी द्यावी का? फेरीवाल्यांचे स्थलांतर, त्यांना बाहेर काढण्याच्या अटी व शर्ती, खासगी रस्त्यांवर व्यवसायाची परवानगी आदींबाबत सखोल अभ्यास होऊन अहवाल बनवण्यात येणार आहे.
सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर !
By admin | Published: January 28, 2016 3:07 AM