आपण 'Legend' गमावला, शरद पवारांनी घेतलं 'दिलीपसाहब' यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:45 PM2021-07-07T14:45:23+5:302021-07-07T14:46:26+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन सायरा बानो यांचे सांत्वन केले.
मुंबई - दिग्गज अभिनेते आणि बॉलिवूडचे महानायक दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्वसामान्य चाहतेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर, दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर निवास्थानी जाऊन दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
बॉलिवूडमध्ये 5 दशकांहून अधिक काळ करिअर केलेल्या दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन सायरा बानो यांचे सांत्वन केले. मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटो शेअर करत माहिती दिली.
आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारजी यांचे आज निधन झाले. याप्रसंगी आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्यासह त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले व दिलीप कुमारजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.#DilipKumarpic.twitter.com/V52XTRAhoc
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 7, 2021
बॉलिवूडची पंढरी असलेल्या मुंबईशी दिलीप कुमार यांचं जवळंच नातं आहे. नाशिक, पुणे आणि मुंबई असा दिलीप कुमार यांचा प्रवास. त्यामुळेच, जगप्रसिद्ध असलेल्या लिजेंड भूमिपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तशा सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, सांताक्रुझ येथील जुहू कब्रस्तान येथे सायंकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येणार आहे.