मुंबई : घाटकोपर पश्चिम विधानसभेत भाजपचे राम कदम यांना ७० हजार २६३ मते मिळाली. येथील अपक्ष उमेदवार संजय भालेराव यांनी मनसे आणि काँग्रेसला पाठी टाकत तब्बल ४१ हजार ४७४ मते मिळविली. साहजिकच राम कदम यांना भाजपसह शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते यांनी केलेल्या मदतीच्या जोरावर मतांचा हा आकडा गाठणे साध्य झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट राम कदम यांची जमेची बाजू ठरल्याने साहजिकच त्यांना मतांचा मोठा पल्ला गाठता आला.
काँग्रेसचे आनंद शुक्ला, मनसेचे गणेश चुक्कल हे दोन्ही उमेदवार कदम यांना ‘टफ फाइट’ देतील, असे चित्र होते. प्रत्यक्षात चित्र उलटे झाले. कदम हे बहुमताने येथे निवडून आले. घाटकोपर येथील बहुतांशी मतदार हा मराठी भाषिक आहे. जेवढा तो मराठी भाषिक आहे; तेवढाच तो गुजराती भाषिकही आहे. साहजिकच हा भाजपचा मतदार असल्याने समाजनिहाय विश्लेषणानुसार या मतदारांचा ओढा भाजप-शिवसेनेकडे होता. परिणामी त्यानुसार, येथे निकाल लागला आणि भाजपचा विजय झाला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये सभा घेतली आणि मनसेला येथे १५ हजार १९ मते मिळाली. येथील काही मतदार अल्पसंख्याक असल्याने काँग्रेसला पुरेशी मते मिळतील, असे चित्र होते. प्रत्यक्षात काँग्रेसला १० हजारांचाही टप्पा ओलांडता आला नाही. काँग्रेसला येथे ९ हजार ३१३ मते मिळाली. तर वंचितला येथे ८ हजार ८८ मते मिळाली. खरी कमाल केली ती संजय भालेराव यांनी. त्यांना तब्बल ४१ हजार ४७४ मते मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शनिवारी भेटण्यास बोलाविले आहे, अशी माहिती अपक्ष उमेदवार संजय भालेराव यांनी दिली.