Join us

बांधकाम व्यवसायाचा तोटा एक लाख कोटी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 6:12 PM

२५० संलग्न व्यवसायांनाही घरघऱ लागणार; या वर्षी घरांच्या विक्रीत ३० टक्के विक्रमी घट    

 

मुंबई : शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या बांधकाम व्यवसायासह त्याच्याशी संलग्न असलेले २५० उद्योगधंदे आणि व्यवसाय कोरनाच्या प्रकोपामुळे अडचणीत आले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत या सर्व व्यवसायांचा एकूण तोटा तब्बल एक लाख कोटी रुपये असेल असा अंदाज व्यक्त करण्यात ला आहे. घरांच्या किंमती कमी झाल्या आणि गृह कर्ज स्वस्त झाले तरी यंदा घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्के विक्रमी घट होण्याची चिन्हे आहेत.  

केपीएमजी या प्रख्यात सल्लागार संस्थेने देशातील गृहनिर्माण, व्यावसायिक बांधकामे, रिटेल आणि हाँस्पिटँलिटी या क्षेत्रांवरील कोरोना प्रभावाचा एक अहवाल प्रसिध्द केला असून त्यात ही निरि‍क्षणे नोंदविण्यात आली आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षांत देशांत ४ लाख घरांची विक्री झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षांत त्यात तब्बल १ लाख २० हजारांची घट होईल आणि २ लाख ८० हजारांपर्यंतच्या घरांचीच विक्री होऊ शकेल असा अंदाज आहे. २०१० ते २०१३ या तीन आर्थिक वर्षांत सरासरी ४ लाख ४७ हजार घरांची विक्री झाली होती. तो आजवरच्या घरांच्या खरेदी विक्रीचा उच्चांक होता. त्या तुलनेत घरांच्या विक्रीत आता लक्षणीय घट होणार आहे. त्यामुळे स्टीलपासून ते रंगापर्यंत आणि सिमेंटपासून ते दरवाजे खिडक्या निर्मिती करणा-यांपर्यंतच्या तब्बल २५० उद्योगांवर विपरीत परिणाम होणार आहे. ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरक्षित निवा-याची गरज पूर्ण करण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे घरांच्या खरेदी विक्रीला थोडी फार चालना मिळू शकेल असा आशावाद या अहवालात हे. तसेच, घर खरेदी विक्रीच्या पद्धतीमध्ये विकासकांना नव्या तंत्रज्ञनाचा समावेश करावा लागेल असे असेही त्यात नमूद आहे.

-----------------------------------

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा खोळंबा

मध्यमवर्गियांना नोकरी गमावण्याची आणि वेतन कपातीची भीती आहे. त्यामुळे परवडणा-या घरांच्या विक्रीत घट होईल असे केपीएमजीचे मत आहे. बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी तुटल्यामुळे प्रकल्पांच्या खर्चात वाढ होईल. विकासकांच्या फायद्याचे गणितही विस्कळीत होईल. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतील करारांना अंतिम स्वरूप देणे, त्यांच्यासाठी संक्रमण शिबिरांची उभारणी करणे आदी कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. त्यामुळे त्या कामांचाही खोळंबा होईल असे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

-----------------------------------

व्यावसायिक जागांचे गणितही बिघडले

नव्याने उभ्या राहणा-या व्यावसायिक बांधकामांपेक्षा त्यांच्या खरेदीचे प्रमाण २०१९ साली सर्वाधिक होते. या व४षी ५ कोटी २० लाख चौरस फुटांचे बांधकाम झाले होते. तर, पूर्वीच्या शिल्लक बांधकामांसह ६ कोटी ४० लाख चौरस फुटांची विक्री झाली होती. त्यामुळे या बांधकामांना अच्छे दिन येतील असे संकेत मिळू लागले होते. ६० टक्के व्यालसायिक तर ४० टक्के निवासी बांधकामांना मागणी होती. मात्र, कोरोनामुळे ते गणितही बिघडले आहे. 

 

टॅग्स :बांधकाम उद्योगकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस