मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:29 AM2019-11-04T03:29:32+5:302019-11-04T03:30:10+5:30
वीज पडून माय-लेकी होरपळल्या : अनेक नद्यांना पूर, कोल्हापुरी बंधाऱ्याचे भराव वाहून गेले
औरंगाबाद: आधीच उशिरा येऊन पिकांचे वाटोळे केलेला परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्याच्या काही भागांत सुरूच आहे. पिकांचे नुकसान सहन न झाल्याने हिंगोली जिल्ह्यात एका शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर नांदेड जिल्ह्यात वीज पडून माय-लेकी गंभीररीत्या होरपळल्या.
जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. भोकरदन व परिसरात तीन-चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला असून कोल्हापुरी बंधाºयाचे भराव वाहून गेले आहेत तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून आजवर जिल्ह्यात वार्षिक ८०० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. औरंगाबाद शहरात रविवारी तर परभणी जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. बीड जिल्ह्यातील धारुर आणि लोखंडी सावरगाव महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्णात एकूण सरासरी १६.५२ मिमी पावसाची नोंद झाली.
‘खडकपूर्णा’ चे पाणी ‘येलदरी’त
दोन दिवसांपूर्वी खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले १ लाख क्युसेस पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पात आता ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येलदरी प्रकल्पा ८३ टक्के पाणीसाठा झाला होता.
१२ वर्षानंतर येलदरी प्रकल्प १०० टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने तीनही जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.
धानोरा गावात घुसले पुराचे पाणी;
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पूर्णा नदीला शनिवारी रात्रीपासूनच मोठा पूर आला. या पुराचे पाणी मध्यरात्री सेनगाव तालुक्यातील धानोरा बं. गावात घुसले होते. तसेच परिसरातील उरलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले.