वीज चोरी केल्यास प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:22+5:302021-07-24T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वीज चोरीच्या प्रकारांमुळे महावितरणसोबतच प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचेही नुकसान होते. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज चोरीच्या प्रकारांमुळे महावितरणसोबतच प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचेही नुकसान होते. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच भांडुप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांनी आपले वीजबिल नियमितपणे भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या इंडियन टेक्निकल वर्क्स कंपनीच्या उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आल्यानंतर महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाने ही कारवाई केली. या प्रकरणात १० जुलै २०२१ रोजी तपासणी केली असता मीटरमध्ये फेरफार असल्याचा संशय आल्यामुळे ग्राहक प्रतिनिधींच्या समवेत १२ जुलै रोजी पंचांसमोर सील उघडून तपासणी करताना वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करीत असल्याचे समोर आले.
या ग्राहकाने १ लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची अनधिकृत वीज वापरल्यामुळे १९ जुलै रोजी इंडियन टेक्निकल वर्क्सचा मालक अजमल जमाल सय्यद याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.