साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 08:08 PM2023-04-13T20:08:25+5:302023-04-13T20:34:51+5:30

अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

Loss of 5.5 acres, no money to pay son's MBA fees; Farmer's call to Uddhav Thackeray | साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर/मुंबई - अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीठमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. मात्र, अवकाळीच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हाता तोंडाशी आलेला घासही गमावल्याने आर्थिक संकट ओढवलंय. आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांना मदतीसाठी आश्वस्तही करण्यात आलंय. मात्र, आभाळच फाटलंय तर नुकसान भरुन तरी कसं निघणार हा खरा प्रश्न आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केलीय. तर, अंबादास दानवे हेही आज शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. 

बीड जिल्ह्यातील बोरगाव येथील शेतकरी दत्तात्रय भागवत शिंदे या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करून दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून त्यांचं बोलणं करून दिले. यावेळी, उद्धव ठाकरेंपुढे आपलं गाऱ्हाणं मांडताना शेतकरी शिंदे यांना अश्रू अनावर झाले. साहेब, माझी साडे ५ एकर जमीन आहे, त्यामध्ये टरबूज, मिर्ची, काकडी आणि टोमॅटो, कांदे अशी फळं होती. मात्र, अवकाळीमुळे सगळंच संपून गेलंय. मला बँकेचे लोन आहेत, काही घरगुती लोन आहेत. माझा एक मुलगा एमबीए करतोय, त्याची फी भरायलाही आता माझ्याकडे पैसे उरल नाहीत, असे गाऱ्हाणे दत्तात्रय शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपुढे मांडले. यावेळी, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन धीर दिला. त्यानंतर, अंबादास दानवे यांनी घरकुल योजनेतून घरासाठी मदत, तसेच संस्थाचालकास बोलून मुलाची फी कमी करण्याचं पाहतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंना याप्रकरणी लक्ष देत असल्याचे सांगितले.    

मदतीचा निर्णय सरकार घेईल 

अतिवृष्टी, संततधार, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीठ अशा प्रकारे सहा महिन्यात चौथ्यांना शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी आणि गारपीठमुळे राज्यात सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे तर मराठवाड्यातील ११ हजार १६६हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५हजार ९५६ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले आहेत. आतापर्यंत ७०टक्के पंचनामे झाले आहेत. २४ तासांत उर्वरित पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 

 

Web Title: Loss of 5.5 acres, no money to pay son's MBA fees; Farmer's call to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.