लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जंगली रमी आणि रमी सर्कल या जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या ॲप्समुळे सामाजिक (विशेषतः तरुण वर्गाचे) नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते गणेश राणू ननावरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेनुसार, ननावरे यांनी आधी राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध सरकारी कार्यालयांना निवेदन पाठवून जंगली रमी आणि रमी सर्कल ॲप्सवर बंदी घालण्याची विनंती केली होती. परंतु त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सामाजिक नुकसान या ॲप्सच्या जाहिराती सेलिब्रिटी मंडळी करीत आहेत. त्यामुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळते, मात्र या प्रकारामुळे सामाजिक नुकसान होत आहे, असा दावा याचिकेत केला आहे.
ॲप्स बेकायदा आहेतदोन्ही ॲप्स कायद्याचे उल्लंघन करत आहेत. हे ॲप्स सार्वजनिक जुगार कायदा, १८६७, बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० यासंह अनेक कायद्यानुसार बेकायदा आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.
तरुण आहारी गेला आहेतरुण वर्ग या ॲप्सच्या आहारी गेला आहे. ॲप्स वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काहींनी आत्महत्या केली आहे. तरुण आपले पैसे गमावत आहेत आणि आत्महत्या करत आहेत, असे ननावरे यांनी याचिकेत म्हटले आहे.