Join us

रुग्णालय भाडेकरारात नुकसान

By admin | Published: February 10, 2015 12:31 AM

ज्यादा दराने जागा भाड्याने घेतली आहे. भाडेकरार करताना झालेल्या चुकांमुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईगरिबांना मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने महापालिकेने हिरानंदानी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला वाशीमध्ये अत्यंत कमी किमतीत भाडेतत्त्वावर जागा दिली. परंतु या योजनेचा गरिबांना अद्याप लाभ झालेला नाही. दुसरीकडे पालिकेने ऐरोलीच्या माता बाल रुग्णालयासाठी मात्र चौपट ज्यादा दराने जागा भाड्याने घेतली आहे. भाडेकरार करताना झालेल्या चुकांमुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवी मुंबईमधील गरीब नागरिकांना सुपर स्पेशालिटी दर्जाचे उपचार मोफत मिळावेत, या उद्देशाने महापालिकेने जुलै २००५ मध्ये वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील १ लाख २० हजार चौरस फूट जागा हिरानंदानी रुग्णालयास अल्प दरात भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. जानेवारी २००६ मध्ये संबंधित रुग्णालयाबरोबर त्याविषयी करार केला होता. महिन्याला ३ रुपये ७५ पैसे दराने ही जागा संबंधित रुग्णालयास देण्यात आली. वर्षाला भाडेदरात १ टक्का वाढ करण्याचे निश्चित करण्यात आले. वाशीसारख्या परिसरामध्ये निवासी जागाही यापेक्षा चार ते पाच पट जास्त दराने भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत. स्वस्त उपचाराच्या नावाखाली प्रशासनाने कवडीमोल दराने हा करार केला. परंतु गरीबांना स्वस्त उपचाराचा लाभ मिळत नाही व दुसरीकडे पालिकेची जागा मात्र दीर्घमुदतीसाठी संबंधित रुग्णालयाच्या ताब्यात गेली आहे. पालिकेला फेबु्रवारी २००७ पासून भाडे मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ४ लाख ५४ हजार ५०० रुपये व आता ५ लाख ७४ हजार ८०० रुपये भाडे मिळत आहे. पालिकेने स्वत:ची जागा सुरुवातीला ३ रुपये ७५ पैसे व आता त्यामध्ये वाढ होऊन ४ रुपये ७९ रूपये दराने भाड्याने दिली व दुसरीकडे ऐरोलीच्या माता बाल रुग्णालयासाठी महाजन रुग्णालयामधील ४९९० चौरस फुटांची जागा २२ रूपये प्रति चौरस फूट दराने भाडेतत्त्वावर घेतली आहे. महिन्याला १ लाख ९ हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. स्वत:ची जागा कवडीमोल दराने देऊन पालिकेने स्वत:च्या रुग्णालयासाठी मात्र तब्बल साडेचार पट जादा दर दिला आहे. हिरानंदानीकडून २००७ पासून ४ कोटी ६३ लाख ४७ हजार रुपये भाडे मिळाले आहे. संबंधितांनाही २२ रुपये दर आकारला असता तर पालिकेस २१ कोटी रुपये भाडे मिळाले असते. मोफत सुपरस्पेशालिटी उपचारासाठी पालिकेने जागा दिली परंतु तो उद्देशही साध्य झालेला नसून यापुढे तरी पालिका भाडेकरार करताना होणाऱ्या चुका थांबविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.