मुंबई : नोकरी गेल्याच्या संशयातून कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचे दोघांनी अपहरण करत त्याचा विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ चित्रित केल्याचा प्रकार मालवणी पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पीडित तरुणाच्या नावे आरोपींनी लोन ॲपमार्फत कर्जही घेतल्याची माहिती आहे.
एग्नल गोम्स आणि आदित्य बडेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुण गोम्ससोबत कॉल सेंटरमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी गोम्सला नोकरीवरून कमी केले. त्यासाठी पीडित तरुण कारणीभूत असल्याचे त्याला वाटले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. पीडित तरुण चार दिवसांपूर्वी ड्युटीवरून घरी जाताना बडेकर आणि गोम्सने त्याला रस्त्यात अडवत मारहाण केली. दुचाकीवर बसवून गोरेगावच्या भगत सिंग नगरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर एटीएममधून त्याच्या बँक खात्यातून काही रक्कम काढली. तसेच एका कागदावर तक्रार न करण्याबाबत लिहून घेत स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.
सहा लाख २१ हजार उकळून सोडून दिले- पीडित तरुणाला तिथे विवस्त्र करत त्याचे अश्लील व्हिडीओ काढून हा गांजा विक्री करतो, असे त्यात नमूद केले. - आरोपींनी त्याच्याकडून एकूण सहा लाख २१ हजार उकळून नंतर त्याची मुक्तता केली. - याप्रकरणी तक्रार मिळताच परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांनी गोम्स आणि बडेकर यांच्या मुसक्या आवळल्या.