Join us

बूट विकण्याच्या नादात गमविले सव्वालाख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:48 AM

महागडे बूट चार हजारांत ओएलएक्सवर विकण्यासाठी ५३ वर्षीय व्यावसायिकाला सव्वा लाख रुपये मोजावे लागल्याची घटना साकीनाका परिसरात घडली.

मुंबई : महागडे बूट चार हजारांत ओएलएक्सवर विकण्यासाठी ५३ वर्षीय व्यावसायिकाला सव्वा लाख रुपये मोजावे लागल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. दिल्लीतील ठगाने शूज खरेदीच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.कांजूरमार्ग येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार व्यावसायिकाचे केक शॉप आहे. त्यांना शूज विकायचे असल्याने, त्यांनी ओएलएक्सवर याबाबत जाहिरात टाकली. त्यात १४ सप्टेंबर रोजी पवनकुमार पांडे नावाच्या तरुणाने कॉल करून तो दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगितले. त्याने शूज विकत घेण्याची इच्छा दर्शाविली. चर्चेअंती चार हजार रुपयांमध्ये शूजचा व्यवहार ठरला.पांडेने कुरियरद्वारे शूज पाठवून, पेटीएमद्वारे पैसे पाठवितो, असे सांगितले. तक्रारदारानेही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पेटीएमची माहिती शेअर केली. पेटीएमद्वारे व्यवहार न झाल्याने पांडेने बँक खात्यामध्ये पैसे पाठवितो, असे सांगून बँकेचा तपशील घेतला. थोड्या वेळाने पुन्हा फोन करत, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगून एटीएम कार्डची माहिती विचारली. त्यांनी विश्वास ठेवून त्याने विचारल्याप्रमाणे एटीएम कार्डची माहिती दिली. पांडेने थोड्या वेळाने एसएमएसद्वारे ओटीपी क्रमांक मिळेल, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तो आवश्यक असल्याचे सांगून ओटीपी क्रमांक सांगण्यास सांगितला. ओटीपी क्रमांक सांगताच फोनवर संभाषण सुरू असतानाच, ओटीपी रद्द झाल्याचे सांगून पुन्हा ओटीपी येईल असे सांगत, पाच वेळा आलेले ओटीपी शेट्टी यांना सांगण्यास भाग पाडले. शेवटी त्याने पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले व नंतर करतो, असे सांगून फोन ठेवून दिला.दुपारी दोन वाजेपर्यंत पांडेच्या फोनची वाट पाहिली. अखेर, त्यांनी मोबाइलमधील संदेश तपासले असता, त्यात १ लाख २४ हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराने त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ रविवारी साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :धोकेबाजी