Join us

'हरलो पण सत्तेसाठी लाचार झालो नाही', पवारांची साथ देणाऱ्या शिंदेंची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 4:06 PM

हरलो असलो तरी लढणं सोडलं नाही, जिंकण्यासाठी कधी तत्व मोडलं नाही.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अनुकूल लागला. राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेला चांगलाच फटका बसलाय. भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत कमी झाल्या आहेत. राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालंय. राष्ट्रवादीने राज्यात 55 जागांवर विजय मिळवला असून साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव केलाय. 

सातारा लोकसभेत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र,  राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गड आला पण सिंह गेला.. अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदेंना जवळपास 9 हजार मतांनी विजय मिळाला आहे. आपल्या पराभवानंतर शशिकांत शिंदेंनी ट्विटर अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट केली आहे.

हरलो असलो तरी लढणं सोडलं नाही, जिंकण्यासाठी कधी तत्व मोडलं नाही. सत्तेसाठी कधी लाचार झालो नाही, असे म्हणत आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या जनतेचं शिंदेंनी आभार मानलंय. तसेच सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही, असं म्हणत त्यांनी पक्षबदलू नेत्यांना टोलाही लगावला. शिंदेंची ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :शशिकांत शिंदेविधानसभा निवडणूक 2019मुंबईसाताराकोरेगाव