मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. सध्या राज्यात गाजत असलेला शरद पवार यांच्या ईडी चौकशीचा विषयावरुन भाजपानेशरद पवारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मी काही बरं-वाईट केलं म्हणून तुरुंगात गेलो नाही असं विधान करत अमित शहांना टोला लगावला होता.
मात्र या विधानाचा उल्लेख करत भाजपाने रम्याचे डोस या माध्यमातून तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो "बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है...! अशा शब्दात टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रम्याच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना लक्ष्य केलं आहे. अलीकडेच भाजपाने कोहिनूर मिल प्रकरणावरुन राज ठाकरेंवरही टीका केली होती. कोट्याधीश जादूगर म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपाने डिवचलं होतं. त्यामुळे भाजपाने केलेल्या या जहरी टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणं गरजेचे आहे.
ईडी चौकशीबाबत पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. आम्हाला दिल्लीसमोर झुकणं माहिती नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. तसेच, आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता मी ईडी कार्यालयात हजर होईल, असे राष्ट्रवादी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई कशी? असे म्हणत पवार यांनी सरकार आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
तर राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई करत नाही. ईडीची कारवाई हे राज्य सरकारच्या हातात नसते. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ज्याला राजकारण कळतं ते सांगू शकेल की राज्य सरकार असं काही करणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आरोप फेटाळून लावले होते.