भंगारच्या आगीने पूर्व उपनगरात धुराचे लोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:09 AM2021-02-06T04:09:26+5:302021-02-06T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मानखुर्द मंडालामधील भंगार साहित्याला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लागलेल्या आगीने संपूर्ण पूर्व उपनगर आगीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मानखुर्द मंडालामधील भंगार साहित्याला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लागलेल्या आगीने संपूर्ण पूर्व उपनगर आगीच्या धुरात लोटले होते. आसपासच्या परिसरात धूर पसरल्याने येथील बहुतांशी परिसर काळोखात बुडाल्याचे चित्र होते.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाकडून दुर्घटनास्थळी १३ फायर इंजिन पाठविण्यात आले. शिवाय ३ फायर टँकर, ११ जेटी आणि रुग्णवाहिका पाठविल्या. याव्यतिरिक्त आग विझविण्यासाठी पाण्याची अडचण येऊ नये म्हणून छेडानगर, देवनार आणि घाटकोपर येथील फिलिंग पाॅइंटस्ची मदत घेण्यात आली. दुपारी लागलेली आग सायंकाळीदेखील धुमसतच होती. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्ला येथील परिसरातून आगीच्या धुराचे लोट दिसत होते. आगीचा धूर लगतच्या परिसरात पसरल्याने दुपारसह सायंकाळी येथील परिसर काळवंडला होता. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगारची गोदामे आहेत. शिवाय लगतच डम्पिंग ग्राऊंडदेखील आहे. यापूर्वी डम्पिंग ग्राऊंडला मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या असून, भंगारच्या गोदामांनादेखील मोठ्या आगी लागल्या आहेत. या दुर्घटनांत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
मानखुर्द येथील आग रात्री उशिरापर्यंत विझविण्याचे काम सुरू होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.