भंगारच्या आगीने पूर्व उपनगरात धुराचे लोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:32+5:302021-02-06T04:10:32+5:30
जीवितहानी नाही ; अग्निशमन दलाचा जवान जखमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मानखुर्द मंडालामधील भंगार गाेदामाला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या ...
जीवितहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मानखुर्द मंडालामधील भंगार गाेदामाला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास लागलेल्या आगीने संपूर्ण पूर्व उपनगर आगीच्या धुरात लोटले होते. आसपासच्या परिसरात धूर पसरल्याने येथील बहुतांशी परिसर काळोखात बुडाल्याचे चित्र होते. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी आग विझवताना अग्निशमन दलाचे एक जवान जखमी झाले. आगीच्या धुरामुळ पूर्वमुक्त मार्गावर रात्री काहीकाळ वाहतूककाेंडी झाली हाेती.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाकडून दुर्घटनास्थळी १३ फायर इंजिन पाठविण्यात आले. शिवाय ३ फायर टँकर, ११ जेटी आणि रुग्णवाहिका पाठविल्या. याव्यतिरिक्त आग विझविण्यासाठी पाण्याची अडचण येऊ नये म्हणून छेडानगर, देवनार आणि घाटकोपर येथील फिलिंग पाॅइंटस्ची मदत घेण्यात आली. दुपारी लागलेली आग सायंकाळीदेखील धुमसतच होती. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्ला येथील परिसरातून आगीच्या धुराचे लोट दिसत होते. आगीचा धूर लगतच्या परिसरात पसरल्याने दुपारसह सायंकाळी येथील परिसर काळवंडला होता. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगारची गोदामे आहेत. शिवाय लगतच डम्पिंग ग्राऊंडदेखील आहे. यापूर्वी डम्पिंग ग्राऊंडला मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या असून, भंगारच्या गोदामांनादेखील मोठ्या आगी लागल्या आहेत. या दुर्घटनांत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
दरम्यान, येथील आग विझवताना हरीश नाडकर हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.रात्री उशिरापर्यंत येथे अग्निशमन दलाच्या वतीने १४ पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. आग मानवी वस्तीमध्ये अधिक पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने अधिक खबरदारी घेण्यात येत होती.
* अवैध ऑईलचा साठा
महापाैर : भूमाफीया टोळीचा बंदोबस्त करणार
- मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामाला आग लागली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित जागा येत असून, या ठिकाणी अवैधपणे ऑईलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी महापालिका व पोलिसांच्या मदतीने कारवाईसुद्धा झाली. परंतु, कारवाईची पाठ फिरताच पुन्हा भूमाफीया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे भूमाफीया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.