नागपूरमध्ये म्हाडाची १५१४ घरांसाठी लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:03 AM2018-07-18T03:03:02+5:302018-07-18T03:03:28+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाच्या) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत १५१४ घरांच्या विक्रीची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाच्या) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत १५१४ घरांच्या विक्रीची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. नागपूरमधील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होईल.
लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना बुधवारी १८ जुलैपासून दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज नोंदणी करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना आॅनलाइन अर्ज गुरुवारी १९ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून भरता येतील. अर्ज नोंदणीसाठी ८ आॅगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत अंतिम मुदत असेल. तसेच अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत ९ आॅगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत असेल.
सोडतीत अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटासाठी रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. आॅनलाइन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विनापरतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटासाठी रु. १५,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये आॅनलाइन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ४४८ (विनापरतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. सोडतीची विस्तृत माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी नागपूर येथील वांजरा, बेलतरोडी, चिखली देवस्थान, चंद्रपूर येथील नवीन, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि नागपूर येथील छाभा (एसडीपीएल ) यांचा प्रकल्प येथील एकूण १३४७ घरांचा लॉटरीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी वांजरा आणि नागपूर येथील छाभा येथील एकूण ७७ घरांचा, तर मध्यम उत्पन्न गटासाठी नागपूर येथील चिखली देवस्थान आणि नवीन चंद्रपूर येथील एकूण ९० घरांचा लॉटरीत समावेश करण्यात आला आहे.