Join us

गिरणी कामगारांच्या ५,०९० घरांची लॉटरी १५ ते २० आॅगस्ट दरम्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 2:05 AM

गिरणी कामगारांच्या होणाऱ्या लॉटरीबाबत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेत्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली.

मुंबई : गिरणी कामगारांच्या होणाऱ्या लॉटरीबाबत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेत्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी गिरणी कामगारांच्या ५०९० घरांची लॉटरी १५ ते २० आॅगस्टदरम्यान काढण्यात येईल असे सांगण्यात आले. यामध्ये ३३६४ घरेही बॉम्बे डार्इंग मिल कामगारांसाठी, तर ४८२ घरे ही श्रीनिवास मिलच्या गिरणी कामगारांसाठी असणार आहेत. तर १२४४ घरे ही एमएमआरडीएची असतील असे सांगण्यात आले.घर मिळावे म्हणून अर्ज केलेल्या सर्व गिरणी कामगारांना घरे लवकरच मिळावीत यासाठी जमीन मिळावी म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी दर्शवलेली जमीन आणि इतर सरकारी व महसूली जमीन पाहून पूर्ण तपशील मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. यानंतर पाठपुरावा करून या जमिनी म्हाडाच्या ताब्यात देऊन सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे सामंत यांनी यावेळी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच लॉटरी लागलेल्या कामगारांना घर मिळवण्यास काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत येत्या बुधवारी संबंधीत म्हाडा अधिकारी तसेच कृती संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. यावेळी कृती संघटनेचे नेते गोविंदराव मोहिते, जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग, नंदू पारकर, निवृत्ती देसाई, बबन गावडे, हेमंत गोसावी व अण्णा शिर्सेकर उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई