म्हाडाच्या कोकण मंडळाची १९ आॅगस्टला ९,०१८ घरांची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:29 AM2018-07-17T05:29:06+5:302018-07-17T05:29:17+5:30
म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच, ९ हजार १८ घरांची लॉटरी जाहीर केली आहे.
मुंबई : म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच, ९ हजार १८ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्र्फे १९ आॅगस्टला सकाळी १० वाजता वांद्रेतील म्हाडाच्या मुख्यालयात ही लॉटरी काढण्यात येईल. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३,९३७ घरांचा समावेश असून, या लॉटरीसाठी येत्या १८ जुलैपासून अर्जदारांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४,४५५ घरांचा लॉटरीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४,३४१ घरांचा लॉटरीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ घरांचा लॉटरीत समावेश आहे, तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ घरांचा लॉटरीत समावेश आहे. या लॉटरीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) १,९०५, खोणी (ता. कल्याण) येथील २,०३२ इतकी अत्यल्प गटातील घरे आहेत.
लॉटरीसाठी १८ जुलैपासून अर्ज नोंदणी सुरू होईल. अर्ज म्हाडाच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील. नोंदणी ८ आॅगस्टपर्यंत सुरू राहील. नोंदणीकृत अर्जदारांसाठी १९ जुलैला दुपारी २ वाजल्यापासून आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. हे अर्ज ९ आॅगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत भरता येतील. १० आॅगस्टला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना अनामत रक्कम, अर्जाचे शुल्क आॅनलाइन भरण्याची मुदत आहे. कोंकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी, आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारेही अनामत रक्कम भरता येणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत ठेवले आहे. अल्प उत्पन्न गटासाठी २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटासाठी रु. ५०,००१ ते रु.७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी उत्पन्न रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न गरजेचे आहे. आॅनलाइन अर्जासोबत भरायची अनामत रक्कम + अर्ज शुल्क अत्यल्प उत्पन्न गटासाठी रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. २०,४४८ प्रति अर्ज आहे. यात आॅनलाइन अर्जापोटी प्रतिअर्ज रु.४४८ (विना परतावा) अर्ज शुल्क आहे.