गणेशोत्सवाआधी पाच हजार घरांसाठी लॉटरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:40 AM2019-08-26T06:40:48+5:302019-08-26T06:41:05+5:30
गिरणी कामगारांसाठी खूशखबर : म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत घोषणेची शक्यता
मुंबई : गणेशोत्सवाच्या आधी म्हाडा प्राधिकरण गिरणी कामगारांसाठी ‘शुभवार्ता’ देण्याच्या तयारीत आहे. कारण येत्या आठवडाभरात गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
१५ आॅगस्टपर्यंत ५ हजार ९० घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली होती. मात्र, गिरणी कामगारांच्या यादीची छाननी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लॉटरी जाहीर करण्यात अडथळा निर्माण झाला. आता ही छाननी प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या आठवड्यात प्राधिकरणाच्या नियोजित बैठकीत लॉटरीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात बॉम्बे डाइंग मिल कामगारांसाठी ३ हजार ३६४ घरे, श्रीनिवास मिल कामगारांसाठी ४८२, तर एमएमआरडीएसाठीच्या १ हजार २४४ घरांचा समावेश असेल. मात्र, सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगारांना घर देण्याचे आव्हान सरकारसमोर अद्यापही कायम आहे.
त्याशिवाय १५ आॅगस्टपूर्वी राज्यभरात सुमारे १४ हजार ६२१ घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, १५ आॅगस्ट उलटून गेल्यानंतरही लॉटरी जाहीर झालेली नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, या लॉटरी प्रक्रियेला खीळ बसण्याची शक्यता आहे.
म्हाडाने ९ मे, २०१६ रोजी सहा गिरण्यांच्या जागेवरील २, ६३४ घरांची, २ डिसेंबर, २०१६ रोजी पनवेलमधील एमएमआरडीएच्या २ हजार १७ घरांची लॉटरी काढली होती. यातील विजेत्यांपैकी बहुतांश जणांना अद्याप ताबा मिळालेला नाही. नवीन लॉटरी काढताना या विजेत्यांना ताबा देण्याच्या प्रक्रियेला गती येणे अत्यावश्यक असल्याचे मत गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
लवकरच देणार देकारपत्र
गिरणी कामगारांसाठी पनवेल कोन येथील २ हजार ४१७ घरांची सोडत २ डिसेंबर, २०१६ रोजी काढण्यात आली होती. या सोडतीमधील विजेत्यांना येत्या ३१ आॅगस्टपर्यंत देकारपत्र देण्यात येतील, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या गिरणी कामगार विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.