Join us

म्हाडाकडून लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी; गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 6:02 AM

मुंबई मंडळातील ही घरे अधिकाधिक गोरेगाव येथील असून, या घरांच्या किमती ३४ लाखांपासून सुरू होतील, अशी माहिती म्हाडाच्या सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण लवकरच नवीन २ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. मुंबई मंडळातील ही घरे अधिकाधिक गोरेगाव येथील असून, या घरांच्या किमती ३४ लाखांपासून सुरू होतील, अशी माहिती म्हाडाच्या सूत्रांनी दिली.

गोरेगाव, दक्षिण मुंबईतील विखुरलेली घरे, पवई, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये असेल. या दोन हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता असली तरी लॉटरीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सुत्रांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता अधिक आहे. 

तत्पूर्वी अर्ज भरून घेण्यासह अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर करत असून, पारदर्शकता यावी, यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये कुठलीही छेडछाड करता येणार नाही, असा दावा म्हाडाने केला आहे.

 

टॅग्स :म्हाडा