श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित विशेष कार्यकारी अधिकारी ( एस.ई.ओ ) पदाच्या नियुक्तीची अंतिम प्रक्रिया वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन निकष आणि कार्यपद्धतीनुसार जवळपास १ हजार १८५ उमेदवारांचे एस.ई.ओ पदाचे अर्ज नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. लवकरच त्यांना नियुक्ती पत्र आणि शिक्के वाटप होणार आहेत. विशेष म्हणजे नवीन सुधारणा आणि अधिकारात एस.ई.ओ नियुक्त करणारा मुंबई उपनगर जिल्हा पहिला ठरणार आहे.
राजकीय दृष्टया आणि मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाच्या २४ मे, २०२३ च्या शासन निर्णयानुसार विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त्तीबाबतचे सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चिंत करण्यात आले होते. त्यानुसार नवीन सुधारणेसह या नियुक्त्या होणे अपेक्षित होते. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. उपनगराचे पालकमंत्री आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे जवळपास ४ हजार ७८६ उमेदवारांचे अर्ज नियुक्तीसाठी आले होते. त्यापैकी १ हजार १८५ उमेदवारांचे अर्ज नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. इतर अर्ज प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
६७५ उमेदवारांचे अर्ज अपात्र
विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी मुंबई उपनगर जिल्हात पालकमंत्री यांच्या कार्यालयाकडून ४ हजार ७८६ नवीन अर्ज शिफारसी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ हजार १८५ उमेदवारांचे अर्ज नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना लवकर निवड पत्र दिले जाणार आहेत. शिवाय १ हजार ७०० अर्जावर कारवाई सुरु असून ६७५ उमेदवारांचे अर्ज नियुक्तीसाठी अपात्र ठरले आहेत.
SEO नियुक्तीसाठी शासनाच्या नवीन सुधारणा
१) जिल्हाधिकारी यांच्याकडून एस.ई.ओ नियुक्तीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याची गरज नाही. यापुढे जिल्हाधिकारी उमेदवारांकडून आलेले अर्ज आणि पालकमंत्री यांनी शिफारशी केलेले उमेदवार लक्षात घेता नियुक्त्तीचे आदेश देऊ शकतात.
२) एस.ई.ओ च्या पोलीस पडताळणीसाठी बराच वेळ लागत होता. यापुढे जिल्हाधिकारी यांनी उमेदवार नियुक्त्तीचे आदेश दिल्यानंतर पोलीस पडताळणी सहा महिन्याच्या आत होणे बंधनकारक आहे. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया सुलभ होणार आहे.