मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ६ हजार ६५१ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) सुमारे पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच २० टक्के घरे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळतील.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे ही मोहीम राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. २०२० सालापर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेतून परवडणारी घरे उपलब्ध करून द्यायच्या उद्देशाने गृहनिर्माण क्षेत्रामध्ये काम करत असलेले म्हाडा प्रशासन जोमाने काम करत आहे. या योजनेअंतर्गत कल्याण शिरढोण परिसरामध्ये अडीच हजार तर खोणी परिसरामध्ये अडीच हजार घरे बांधण्यात येतील. २०२१ पर्यंत ही घरे बांधून पूर्ण करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा मानस असल्याचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाच हजार घरांच्या योजना मंजुरीच्या प्रक्रियेचे म्हाडा कोकण मंडळाकडून अंतिम टप्प्यामध्ये काम सुरू आहे. हे काम येत्या १५ ते २० दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत म्हाडा कोकण मंडळाची ही लॉटरी प्रसिद्ध होणार आहे.
कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची डिसेंबरमध्ये लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:42 AM