अजय परचुरे
मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या नुकत्याच झालेल्या १,३८४ घरांच्या लॉटरीत ज्यांना घर लागले नाही, त्यांच्यासह समस्त मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ नव्या वर्षात जुलैमध्ये तब्बल २,००० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. या संदर्भात मुंबई मंडळातील प्रत्येक विभागाला मुंबईत घर शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता, या वर्षी आम्ही घरांची संख्या २००० पर्यंत घेऊन जाण्याच्या तयारीत आहोत, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मुंबई मंडळाच्या रविवारी जाहीर झालेल्या लॉटरीतच राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी २०१९च्या लॉटरीत मुंबईतील लॉटरीच्या घरांची संख्या दुप्पट करणार असल्याचे सुतोवाच केले होते. रविवारच्या लॉटरीत १,३८४ घरांसाठी तब्बल १ लाख ६४ हजार ४०० अर्ज म्हाडाकडे आले होते. मुंबईतील घरांची वाढती मागणी पाहता, घरांचा आकडा दुप्पट करणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे रविवारी लॉटरी जाहीर झाल्यानंतर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सोमवारी तातडीने मुंबई मंडळाची बैठक घेतली. यात मुंबईतील कोणत्या जागांवर लॉटरीसाठी घरे उपलब्ध होतील, याबाबत चर्चा झाली. चर्चेअंती म्हाडाच्या मुंबई मंडळातील प्रत्येक विभागाला घरे शोधण्यास सांगण्यात आले. या संदर्भातील अहवाल लवकरच म्हाडा अध्यक्षांना सादर केला जाईल. मात्र, जुलैमध्ये होणाऱ्या लॉटरीत २००० घरांचे लक्ष्य असेलच, अशी स्पष्टोक्ती कुशवाह यांनी दिली.
म्हाडा या २,००० घरांसाठी विकासकांबरोबर संयुक्त गृहप्रकल्प साकारत आहे, तसेच प्रीमियरच्या रूपाने म्हाडा दुरुस्ती मंडळाला मिळालेल्या घरांमधून जुलैमध्ये २०१९ ची मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होईल. २०१८च्या लॉटरीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळेच २०१९ची म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होण्यास पुढचा डिसेंबर उजाडेल, असा कयास होता. मात्र, २०१९ची लॉटरी वेळेवरच व्हावी, यासाठी मुंबई मंडळ प्रयत्नशील असून, त्यासाठी २०१८ची लॉटरी पूर्ण झाल्यावर म्हाडाचे कर्मचारी तत्काळ पुढच्या वर्षीच्या कामाला लागले आहेत, असे कुशवाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.निवडणुकीआधी लॉटरीची लगीनघाईनिवडणूक काळात म्हाडाचे कर्मचारी, अधिकारी निवडणुकांच्या कामात व्यस्त होतात. विधानसभा निवडणुका जुलैनंतर होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे लॉटरीसाठी२२२ जुलैमध्येच घाई करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे.