मुंबईकरांसाठी खूशखबर! एक हजार घरांसाठी निघणार लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:52 AM2018-08-25T11:52:27+5:302018-08-25T12:22:58+5:30
म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.
मुंबई : घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लॉटरी असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. मुंबई मंडळासाठी 900 ते 1000 घरांसाठी ही लॉटरी असल्याची माहिती मेहतांनी दिली. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 9,018 घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर करण्यात आली. त्यावेळी म्हाडाच्या कोकण विभागाच्या लॉटरीसाठी कमी ऑनलाईन अर्ज आले हे मान्य करतो. मात्र यावेळी लोकांचा प्रतिसाद का कमी मिळाला याविषयी मी स्वतः माहिती घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
घरे जास्त असूनही लोकांनी का पाठ फिरवली, आम्ही कुठे कमी पडलो यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या मुंबई लॉटरीमध्ये असा प्रतिसाद मिळू नये म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. म्हाडा कोकण विभागीय लॉटरीसाठी ऑनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या 55,324 अर्जांतून या 9,018 घरांच्या लॉटरीची आज सोडत होती. म्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी 10 वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला.