म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 21:43 IST2024-09-13T21:40:13+5:302024-09-13T21:43:00+5:30
म्हाडाला बिल्डरकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० घरांच्या किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या
मुंबई : म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे. दरम्यान, म्हाडाला बिल्डरकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० घरांच्या किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून प्रारंभ झाला. १९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे. २७ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध होईल.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइडवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. लॉटरी झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाइडवर प्रसिद्ध केली जातील.
उत्पन्न गट - घरे
अत्यल्प उत्पन्न गट - ३५९
अल्प उत्पन्न गट - ६२७
मध्यम उत्पन्न गट - ७६८
उच्च उत्पन्न गट - २७६