म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी ठाण्यात निघणार

By सचिन लुंगसे | Published: February 14, 2024 07:41 PM2024-02-14T19:41:52+5:302024-02-14T19:44:07+5:30

पात्र अर्जांची संगणकीय सोडत २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

lottery of 5 thousand 311 houses of mhada will be held in thane | म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी ठाण्यात निघणार

म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी ठाण्यात निघणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार्‍या या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित राहणार आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात  येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच  विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

१५ सप्टेंबर रोजी कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती.  या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण ३१८७१ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २५०७८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे.
- एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका
- सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका
- टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका
- प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७८ सदनिका
- प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी आहे.  

Web Title: lottery of 5 thousand 311 houses of mhada will be held in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा