५ हजार घरांच्या लॉटरीचा निर्णय आज होईल? म्हाडा उपाध्यक्षांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:11 PM2024-01-04T14:11:55+5:302024-01-04T14:12:40+5:30
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाईल, अशी आशा असतानाच आता नव्या वर्षातही अद्याप लॉटरीची तारीख निश्चित होत नसल्याची चर्चा म्हाडा वर्तुळात रंगली आहे.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी काढण्यास प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. प्रशासकीय कारणात्सव १३ डिसेंबर रोजी होणारी लॉटरी पुढे ढकलण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाईल, अशी आशा असतानाच आता नव्या वर्षातही अद्याप लॉटरीची तारीख निश्चित होत नसल्याची चर्चा म्हाडा वर्तुळात रंगली आहे.
किती आहेत घरे?
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १०१० घरे
- एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत १०३७ घरे
- सर्वसमावेशक योजनेंतर्गत ९१९ घरे
- टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी ६७ घरे
- म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता.
- लॉटरीसाठी एकूण ३०,६८७ अर्ज प्राप्त झाले होते, तर अनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त झाले होते.
- कोकण मंडळाची लॉटरीची घरे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, लॉटरीची दिनांक अर्जदारांना मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
- गुरुवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत लॉटरीची तारीख निश्चित होईल, अशी माहिती कोकण मंडळाकडून देण्यात आली.