पत्राचाळीच्या ६८६ घरांची लॉटरी; रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:49 AM2024-02-20T10:49:09+5:302024-02-20T10:50:52+5:30
रहिवासी म्हणतात, ओसी मिळाल्याशिवाय घरांचा ताबा घेणार नाही.
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे रखडलेले काम आता वेगाने सुरू झाले आहे. इमारतींमधील ६८६ घरांची लॉटरी जून महिन्यात काढण्यासाठी प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे इमारतींना ओसी मिळाल्याशिवाय घरांचा ताबा घेणार नाही, अशी भूमिका गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेने घेतली आहे. त्यामुळे म्हाडासमोर पेचप्रसंग निर्माण झाला असून, यावर प्राधिकरण कसे तोडगा काढते? याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
परवडती, अशी घरे म्हाडामार्फत बांधली जात असतानाच पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १३ वर्षांपासून प्रलंबित होता. लोकांसह चर्चा करून प्रशासनातल्या अडचणी सोडवून पत्राचाळ प्रकल्पाचा पुनर्विकास म्हाडाने स्वत:कडे घेतला.
सर्व घरांचे काम अपूर्ण :
आर-९ हा भूखंड पूर्णपणे वसाहतीसाठी होता. मात्र म्हाडाने या भूखंडावर दुकानांचे काम सुरू केले आहे. त्रिपक्षीय करार यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. आता कोणताच करार करण्यात आलेला नाही. यासंदर्भात रहिवाशांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
घरांसह दुकानांची लॉटरी काढण्यावर म्हाडा आग्रही असली तरी रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. कारण लॉटरी ओसीनंतर काढली जाते, रहिवाशांचे म्हणणे आहे. शिवाय सर्व घरांचे कामही पूर्ण झालेले नाही.
घरांच्या लॉटरीला विरोध :
१) गोरेगाव पत्राचाळ येथील रहिवाशांनी मात्र घरांच्या लॉटरीला विरोध केला आहे. कारण रहिवाशांच्या म्हणण्यानुसार म्हाडाने अद्यापही संस्थेसोबत कोणताही करार केलेला नाही. या करारानुसार रहिवाशांना घरे मिळणे अपेक्षित आहे.
२) शिवाय इमारतींचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. बांधकाम पूर्ण झाले नसल्याने ओसीदेखील मिळालेली नाही. जर ओसी मिळाली नसेल तर रहिवासी घरांचा ताबा कसा काय घेतील? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे म्हाडाकडून येथे बांधण्यात येत असलेल्या दुकानांना आणि घरांच्या लॉटरीला विरोध करण्यात येत असल्याची माहिती गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून देण्यात आली.
रहिवाशांना दिलासा :
पत्राचाळीच्या पुनर्विकासासंदर्भात जॉनी जोसेफ समितीच्या शिफारशी आणि अभिप्रायानंतर म्हाडाने विकासक म्हणून काम सुरू केले. आता या प्रकल्पाचे काम सुरू असतानाच रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडाने वेगाने काम सुरू केले आहे. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना विचारले असता त्यांनी जून महिन्यात पत्राचाळीतील घरांची लॉटरी काढण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले.