Join us

१४ ऑगस्टला म्हाडाच्या घरांची लॉटरी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

By सचिन लुंगसे | Published: August 09, 2023 8:39 PM

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे बोलत होते.

मुंबई :म्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर अतुल सावे बोलत होते.  मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ०१,२०,१४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती सावे यांनी दिली. सर्व अर्जदारांची प्रतीक्षा व उत्सुकता लक्षात घेता १४ ऑगस्ट रोजी मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री  अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचे सावे यांनी संगितले. याप्रसंगी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल,  मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.

गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सावे यांनी पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयास आज भेट दिली. म्हाडा भवनात झालेल्या बैठकीत सावे यांनी म्हाडाच्या कामकाजाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचे नियोजन, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश होता. सावे म्हणाले की, गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक घरांची निर्मिती होऊ शकते. याकरिता पुनर्विकास प्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदे व नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात शासनातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सावे यांनी यावेळी दिली.  

मुंबई मंडळातर्फे सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे.  प्रधान मंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे  असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातिल ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी (४१५)  या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत.

तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२  अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव(४१६) या योजनेकरिता आहेत आहेत तर  मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी  ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदीवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.

टॅग्स :म्हाडामुंबई