मुंबई - छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी व धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेली ११३३ घरे व ३६१ भूखंडांसाठी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
११३३ घरे व ३६१ भूखंडांसाठी एकूण ४७५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह ३९८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४२५ घरे, म्हाडा गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ७०८ घरे तसेच ३६१ भूखंड आहेत. ही लॉटरी अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. भूखंड सर्व उत्पन्न गटातील अर्जदारांकरिता आहेत, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली.
नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी होत आहे. या प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाईल. त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाईल. - अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.- नागरिकांना अल्पावधीतच निकाल जाणून घेता येणार आहे. घरबसल्या थेट प्रक्षेपण१) https://www.vccme.in/chattrapati-sambhaji-nagar/ २) https://www.facebook.com/mhadaofficial - विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर लॉटरी दिवशी सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध होईल.- विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती कळविली जाईल.