मुंबई : आरोग्य सेवांना अधिक बळकटी यावी तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी यासाठी आशियाई विकास बँकेतर्फे ४१०० कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी) चालू करण्यासह सुपरस्पेशालिटी कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठित करण्यात येणार आहे.
आशियाई विकास बँकेतर्फे मिळणाऱ्या निधीत सध्या काही मेडिकल कॉलेजेस राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यात आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जळगाव, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद येथील कॉलेजेसचा समावेश आहे. त्याशिवाय परभणी, रत्नागिरी, अमरावती, गडचिरोली, भंडारा आणि अंबरनाथ या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू करण्यात येणार आहेत.
या विशेष प्रकल्पाच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव यांच्यासोबत ३० जानेवारी रोजी आशियाई विकास बँकेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. त्यामध्ये एचएमआयएस प्रणाली, वैद्यकीय शिक्षण विभागातील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र कक्षाची स्थापना, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कक्ष, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्ता तसेच प्रकल्पासाठी आवश्यक नियंत्रण यंत्रणा या अशा विविध धोरणात्मक मुद्यांबाबत निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने शासन स्तरावरील नियंत्रण यंत्रणा म्हणून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यांचा समावेश आहे.