मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मौलाना आझाद रोड येथील ३४६-३५२ व कावासजी पटेल मार्ग-फोर्ट येथील ३४-३४ ए या दोन पुनर्रचित इमारतीत ५९ मूळ निवासी पात्र भाडेकरू-रहिवाशांचा इमारतीतील सदनिका क्रमांक व सदनिकेचा मजला निश्चित करण्यासाठी संगणकीय सोडत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते नुकतीच काढण्यात आली. वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी घोसाळकर म्हणाले की, या दोन्ही इमारतीतील रहिवाशी अनेक वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित होते. मात्र, आता म्हाडाच्या माध्यमातून त्यांना मालकी हक्काचे घर मिळणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने भाडेकरु-रहिवाशी यांना संरक्षण दिल्यामुळेच गृहस्वप्नपूर्तीचा हा दिवस उजाडल्याचे श्री. घोसाळकर यांनी स्पष्ट केले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील पुनर्रचनेला जाणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू- रहिवाशी यांना मुंबईतच संक्रमण गाळा देण्याचा मानस श्री. घोसाळकर यांनी व्यक्त केला. मुंबईच्या हृदयस्थानी असणारी ही घरे कुठल्याही अमिषाला बळी न पडता विकू नका, असे आवाहन सभापती महोदयांनी केले. मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. दिनकर जगदाळे म्हणाले की, कार्यपुर्ततेचा आजचा दिवस आहे. या दोन्ही इमारतींची पुनर्रचना झाल्यामुळे मानसिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे, उपमुख्य अधिकारी मिलिंद कुलकर्णी, अभिषेक घोसाळकर, कार्यकारी अभियंता त्रिपाठी, मदने यांच्यासह भाडेकरू-रहिवाशी उपस्थित होते.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे दोन पुनर्रचित इमारतीतील गाळ्यांची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 7:53 PM