लॉटरी विक्रेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:16 AM2018-04-19T03:16:16+5:302018-04-19T03:16:16+5:30
भाजपा सरकारने लॉटरी उद्योग बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता.
मुंबई : लॉटरी उद्योगावर लादण्यात आलेल्या २८ टक्के वस्तू व सेवा कराविरोधात (जीएसटी) विक्रेत्यांच्या महाराष्ट्र राज्य लॉटरी अभिकर्ता-विक्रेता सेनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. केंद्र सरकारचे लॉटरी उद्योग बंद करण्याचे कुटील कारस्थान शिवसेना हाणून पाडेल, अशा शब्दांत उद्धव यांनी विक्रेत्यांना आश्वासित केले.
महाराष्ट्र राज्य लॉटरी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहलकुमार शहा यांनी सांगितले की, याआधीही भाजपा सरकारने लॉटरी उद्योग बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता. आता केंद्र सरकारच्या २८ टक्के जीएसटीमुळे या उद्योगातील २ लाख रोजगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन लॉटरी विक्रेते आणि एजंट यांनी उद्धव यांची भेट घेतली. त्यात उद्धव यांनी विक्रेत्यांचा रोजगार हिरावू देणार नसल्याचे आश्वासित केल्याने संघटनेला दिलासा मिळाला आहे.
लॉटरी विक्रेत्यांसाठी शिवसेना मैदानात उतरेल, अशी ग्वाही उद्धव यांनी दिली. खा. राहुल शेवाळे आणि खा. अरविंद सावंत यांनीही केंद्रात हा सवाल उपस्थित करण्याचे आश्वासित केले. या वेळी उद्धव म्हणाले की, केंद्र शासनमान्य राज्य लॉटरींवर देशात विक्री करताना १२ टक्केच जीएसटी आकारण्याची मागणी केली जाईल. लवकरच महाराष्ट्र राज्याची आॅनलाइन लॉटरी सुरू करण्याबाबत अरुण जेटली आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली जाईल.