Join us

धारावी सेक्टर पाचमधील घरांसाठी निघणार लॉटरी

By admin | Published: November 02, 2015 2:29 AM

धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५चा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर ‘जे’मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची अंतिम यादी दिवाळीनंतर

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५चा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर ‘जे’मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्रतेची अंतिम यादी दिवाळीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर पात्र झोपडीधारकांना लॉटरीच्या माध्यमातून घराचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आलेल्या सलग सुट्यांमुळे दिवाळीत घराचा ताबा देण्याचा म्हाडाचा मुहूर्त चुकला आहे.आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणामार्फत सेक्टर १ ते ४चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर सेक्टर ५च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाने क्लस्टर ‘जे’मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगरातील झोपडीधारकांची पात्र, अपात्रतेची प्रारूप यादी जाहीर केली आहे. ५२४ झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रेच्या प्रारूप यादीत २३३ झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने म्हाडाने त्यांना अपात्र ठरवले आहे; तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ६४ झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.अपात्र आणि प्रलंबित प्रकरणांमधील झोपडपट्टीधारक म्हाडाकडे आपल्या हरकती नोंदवत आहेत. त्यांना म्हाडाकडे १0 नोव्हेंबरपर्यंत आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर पात्र-अपात्रतेची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, दिवाळीमध्ये सलग सुट्या असल्याने म्हाडाने निश्चित केल्याप्रमाणे झोपडीधारकांना दिवाळीत ताबा देणे अशक्य झाले आहे. तसेच पात्र रहिवाशांकडून इमारतीमध्ये विशिष्ट माळ्यावर घर देण्याची मागणी लक्षात घेता, त्यावरून ताबा प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांनी लॉटरीमार्फत रहिवाशांना घराचा ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे.