लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लग्नाची आठवण स्मरणात राहावी व लग्न सोहळा विशेष व्हावा यासाठी धूमधडाक्यात साजरा करतात. लग्नाच्या वेळेचा मुहूर्त काढला जात असला तरी त्या मुहूर्तावर लग्न लागतेच असे नाही.
लग्नाआधीच्या वरातीत बराच वेळ जात असल्याने दोन-दोन तास उशिरा लग्न लागतात; मात्र लग्न मुहूर्त महत्त्वाचा असल्याने मुहूर्तावर लग्न लागणे आवश्यक असल्याचे गुरुजींचे म्हणणे आहे.
लग्न मुहूर्त टळतो कारणमुंबईसारख्या शहरात विवाहासाठी हॉल मिळणे कठीणच. हॉल मिळाला तरी तो वधू-वरांच्या घरापासून फार दूर असतो. त्यामुळे मुंबईतील ट्रॅफिकमधून मार्ग काढत विवाह दिवशी मुहूर्ताआधी हॉलवर पोहोचणे सर्वांनाच जमते असे नाही. त्यामुळे अनेकदा मुहूर्त टळतो व उशिरा लग्न होते.
वरातीत तासन्तास नाचल्यामुळे उशीर अनेकदा काही नवरदेवांची लग्नाआधी हॉलवर जाईपर्यंत वरात काढली जाते. या वरातीत डीजे अथवा बँड पथकाच्या तालावर वऱ्हाडी मंडळी थिरकते त्यामुळे वरातीत तासन्तास नाचल्यामुळे नवरदेवाला हॉलवर पोहोचण्यास उशीर होतो व लग्न मुहूर्त टळतो.
फोटो सेशनमुळे हाेताे उशीरकॅमेऱ्याच्या जमान्यात फोटोचा मोह वधू-वरांना आवरता येत नाही. लग्न मुहूर्ताच्या आधी बरेच वधू-वर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो सेशन करतात यात बराच वेळ जातो. त्यामुळेही विवाह मुहूर्त चुकतो.
नेतेमंडळी, आप्तेष्ट यांची वाट पाहणेआपल्या लग्नात नेतेमंडळी, आपले जवळचे आप्तेष्ट यावेत त्यांनी शुभाशीर्वाद द्यावेत, मंगलाष्टकांवेळी त्यांच्या हातून आपल्या डोक्यावर अक्षता पडाव्यात अशी काही वधू-वरांची इच्छा असते त्यामुळे जोडपी नेतेमंडळी, पाहुण्यांची वाट पाहतात व मुहूर्त हुकतो.
विवाह मुहूर्त अतिशय महत्त्वाचा असून विवाहात म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकातही `आली समीप लग्नघटिका’’ असे म्हटले जाते, कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रहदिशांची अनुकूलता पाहून सुनिश्चित केलेला असतो. लग्न मुहूर्तावर विवाह झाला, तर त्याचे परिणामही शुभ असतात. म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता, जोडप्यांनी नेमून दिलेल्या मुहूर्तावर विवाह करण्याचा प्रयत्न करावा. - आनंद फडके, पुरोहित