कोरोनाकाळातही मोबाइल नंबर पोर्ट करणारे जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:21+5:302021-07-14T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात एकीकडे सर्व व्यवहार बंद असताना मोबाइल नंबर पोर्ट करणारे मात्र जोरात असल्याचे समोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात एकीकडे सर्व व्यवहार बंद असताना मोबाइल नंबर पोर्ट करणारे मात्र जोरात असल्याचे समोर आले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार एकट्या मार्च महिन्यात तब्बल १२.७४ दशलक्ष ग्राहकांनी आपल्या मोबाइल कंपन्या बदलल्या असून, आतापर्यंत पोर्टिबिलिटी सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ५७६.६७ दशलक्षांवर पोहोचली आहे.
नेटवर्कची उपलब्धता, इंटरनेट स्पीड किंवा अन्य समस्या जाणवत असल्यामुळे गेल्या काही महिन्यांत मोबाइल नंबर पोर्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश नागरिक घरात असल्यामुळे इंटरनेट किंवा नेटवर्क सुविधेवरील भार वाढला. परिणामी घरातून काम करणाऱ्यांना बऱ्याच अडचणी जाणवू लागल्याने त्यांनी थेट आपली मोबाइल कंपनी बदलली. या संकटकाळात बहुतांश दूरसंचार कंपन्यांनी स्पर्शविरहित पोर्टिबिलिटी सेवा उपलब्ध करून दिल्याने ही प्रक्रियाही सुलभ झाली. त्यामुळे कोरोनाकाळातही ग्राहकांना बिनदिक्कत आपली मोबाइल कंपनी बदलता आली, अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आली.
ट्रायच्या अहवालानुसार, फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोर्टिबिलिटी सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ५६३.९२ दशलक्ष इतकी होती. मार्च महिन्यात त्यात १२.७४ दशलक्ष ग्राहकांची वाढ होत एकूण संख्या ५७६.६७ दशलक्षांवर पोहोचली. आजमितीस देशभरात ११८०.९६ दशलक्ष नागरिकांकडे मोबाइल असून, त्यातील ९९३.९२ दशलक्ष ग्राहक नियमित मोबाइल वापरतात. दिल्लीत दूरसंचार क्षेत्राची घनता सर्वाधिक असून, त्याखालोखाल हिमाचल प्रदेश आणि केरळचा नंबर लागतो. महाराष्ट्र पाचव्या स्थानी, तर बिहारमधील टेलिडेंसिटी सर्वांत कमी आहे.
मार्च महिन्यात मोबाइल क्रमांक पोर्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्राहकांची संख्या ४७.१४ दशलक्ष इतकी आहे. त्यापैकी २५.४९ दशलक्ष ग्राहक मुंबईतील आहेत, तर कर्नाटक ४८.०५, आंध्र प्रदेश ४५.९४, तामिळनाडू ४४.९७, तर मध्य प्रदेशातील ४०.८९ वापरकर्त्यांनी पोर्टिबिलिटी सुविधेचा लाभ घेतला.
‘एमटीएनएल’ला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
ट्रायच्या आकडेवारीनुसार एमटीएनएलची सेवा बदलणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. मार्च महिन्यात ८ हजार ३९ ग्राहकांनी एमटीएनएलला सोडचिठ्ठी दिली. त्यात मुंबईतील ४ हजार ३४, तर दिल्लीतील ४ हजार ५ ग्राहकांचा समावेश आहे. मोबाइल ग्राहकसंख्येचा विचार करता जिओ आघाडीवर असून, त्याखालोखाल भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएल, एमटीएनएल आणि सर्वांत खाली रिलायन्स कम्युनिकेशनचा क्रमांक लागतो. डबघाईस आलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनकडे सध्या ९ हजार १७५ वापरकर्ते आहेत.