मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शिंदे गट - भाजप युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. याबरोबर शिंदे गटातील आमदार येत असताना ‘आले रे आले ५० खोके आले...’ ‘खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो...’ अशाही घोषणा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्र्यांबरोबर जेव्हा विधानभवनात येत होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांनी विशेषतः शिवसेनेच्या आमदारांनी या घोषणा जोरदारपणे द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेंची स्वारी... आले रे आले गद्दार आले, अशा विविध घोषणांनी विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.