प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांवर बंधने; मनमानीला चाप; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:03 IST2025-03-12T07:03:13+5:302025-03-12T07:03:22+5:30
आवाजासाठी दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबलची मर्यादा, उल्लंघन केल्यास पुन्हा परवानगी नाही

प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांवर बंधने; मनमानीला चाप; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवावे लागणार
मुंबई : प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यास सरसकट परवानगी दिली जाणार नाही, असे सांगताना त्या बाबतच्या बंधनांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या अटींचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त केला जाईल आणि तो पुन्हा लावण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या देवयानी फरांदे यांनी या बाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. नाशिकमधील अलीकडेच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी अनेकांसाठी त्रासदायक ठरणारे, ध्वनिप्रदूषण करणारे हे भोंगे हवेतच कशाला, असा प्रश्न केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ते बंद असले पाहिजेत. तसेच सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच्या कालावधीत ते दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील. याचे उल्लंघन झाले तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करेल.
परवानगीशिवाय परस्पर भोंगे लावता येणार नाहीत. नियमांचे उल्लंघन केले तर भोंगे जप्त केले जातील आणि नंतर पुन्हा परवानगी मिळणार नाही. या सगळ्या बाबींच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाची असेल. अंमलबजावणी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
लक्षवेधी सूचना मांडताना देवयानी फरांदे यांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांच्या आवाजाचा विद्यार्थी, वयोवृद्धांना त्रास होतो. तसेच मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते अशी तक्रार केली. या संदर्भात न्यायलयीन आदेशांचे पालन पोलीस विभागाकडून केले जात नाही याकडे लक्ष वेधले.
'तत्काळ कारवाई करा...'
उपप्रश्नात देवयानी फरांदे म्हणाल्या की, सणावाराच्या दिवशी भोंगे लावले तर हरकत नाही, पण हे भोंगे दिवसातून पाच वेळा वाजत असतात. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर पत्र मिळूनही कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्व भोंगे उतरविले होते. राज्य सरकारने तत्काळ उद्यापासून या भोंग्यांवर कारवाई करावी.
अतुल भातखळकर यांनी देखील, यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी. या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार का? आणि याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का? असे प्रश्न उपस्थित केले.
नियमात सुधारणेसाठी केंद्राकडे प्रस्ताव देणार
डेसिबल मोजण्याची यंत्रणा प्रत्येक पोलिस ठाण्याकडे आहे. भोंग्यांसंदर्भात कायद्याची कठोर अंमलबजावणी करायची झाल्यास सध्या तरी पोलिसांना फारसे अधिकार नाहीत. केंद्र सरकारला यासंबंधीच्या नियमात सुधारणा करण्यासाठीचा आपला प्रस्ताव देण्यात येणार आहे, जेणेकरून कठोर कारवाई करता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सकाळी ९ च्या भोंग्यावर कोण कारवाई करणार?
या भोंग्यांवर तर कारवाई करूच पण सकाळच्या रोज ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्यावर कोण कारवाई करणार असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. तेव्हा एकच हशा उसळला.