प्रार्थनास्थळांवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच भोंगे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:51 AM2022-04-21T06:51:19+5:302022-04-21T06:55:01+5:30
बेकायदा बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकांची परवानगी दिली जाणार नाही...
मुंबई: भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्यात येत आहे. समाजकंटकांना फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४, १४९ आणि १५१ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. आता फक्त सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यात येणार आहे.
मुंबईपोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेसह प्रार्थनास्थळांवर ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत मुद्द्यांवर चर्चा झाली. शहरात एकूण ९९६ मशिदी आणि जवळपास तितकीच मंदिरे आहेत. त्यांनी पोलीस व इतर यंत्रणांकडून कायदेशीरपणे विविध परवानग्या घेतल्या आहेत.
बेकायदा बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकांची परवानगी दिली जाणार नाही. आता एका धार्मिक स्थळाला किती ध्वनिक्षेपकांची परवानगी द्यायची, याबाबत चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धार्मिक नेत्यांची बैठक घेत त्यांना नियमावलीबाबत माहिती देण्यात येत आहे.